नागपूर ,दि.17: मनुवादी विचार देशात डोके वर काढू पाहत आहे. संविधानापेक्षा मनुस्मृती यांना श्रेष्ठ वाटू लागली आहे. भाजपा संविधानाला नख लावू पाहत आहे.मात्र, रक्त सांडले तरी संविधान बचावासाठी आम्ही लढाई लढू. संविधान बदलण्यासाठी सरसावणारे हात कलम करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपुरातील देशपांडे सभागृहात ‘संविधान बचाव, देश बचाव मेळावा’ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी पेटती मशाल उंचावून संविधान रक्षणाची शपथ घेण्यात आली. मेळाव्याला माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, रमेश बंग, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रकाश गजभिये, पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, आ. विद्या चव्हाण, आ.सुमन पाटील, आ. ज्योति कलानी, आ. संध्या कुपेकर, आ. दिपीका चव्हाण, माजी आमदार उषा दराडे, शहर अध्यक्ष अलका कांबळे यांच्यासह विदर्भातील सर्व महिला जिल्हाध्यक्ष उपस्थित होत्या. या वेळी अजित पवार म्हणाले, संतांपेक्षा मनु श्रेष्ठ आहे, असे सांगण्याचे धाडस संभाजी भिडे करतातच कसे. त्यांच्या मागचा मास्टर मार्इंड कोण आहे, असा सवाल करीत कुठल्या दिशेने कारभार सुरू आहे, याचा जाब त्यांनी सरकारला विचारला. कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणूक लागू शकते, असे सांगत भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.
जयंत पाटील म्हणाले, भाजपाचे केंद्रीय मंत्री संविधान बदलण्यासाठी आम्ही सत्तेत आल्याचे सांगतात. सरसंघचालक मोहन भागवत आरक्षणाच्या फेरविचारासाठी समिती नेमण्याची शिफारस करतात. भाजपा संविधानाला धक्का पोहचवू पाहत असल्याचे सांगत भाजपचे मनसुबे उधळून लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment