गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.21ः- जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी अहेरी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून २६ ऑगस्ट १९८२ रोजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. जिल्हा मुख्यालयापासून ११0 किमी अंतरावरील अहेरी, २१0 किमी अंतरावरील सिरोंचा, १८२ किमी अंतरावरील भामरागड व १३0 किमी अंतरावरील एटापल्ली तालुके अतिशय दुर्गम असून येथील सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी नागरिकांना जिल्हा विभागणीचा कोणताही फायदा झालेला नाही. येथील जनतेला जिल्हा मुख्यालयात जाऊन शासकीय कामे करू गावी परत येणे एका दिवसात होत नाही. त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सिरोंचा तालुक्यातील पातागुडम येथील नागरिकांना जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर २८0 किमी पडत असल्यामुळे त्यांना शासकीय कामासाठी २ ते ३ दिवस मुक्कामी राहून आपली कामे करून परत यावे लागते.
या क्षेत्रातील आजही काही गावात शासन, प्रशासनातर्फे वीज, रस्ते, पूल उभारण्यात आलेले नाही. अहेरी विधानसभा क्षेत्रातील तालुके वनव्याप्त असून या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात सागवानाची झाडे असल्या कारणाने या झाडांची विक्री करून शासनास दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होत असतानाही या भागात शासनाचा निधीच पोहोचत नसल्याने विकासाची कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील या तालुक्यातील समस्या कायमस्वरूपी सोडवायच्या असल्यास शासनाने तत्काळ अहेरी जिल्हा घोषित करणे आवश्यक आहे. यावर तत्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा येत्या काही दिवसात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना युवक कॉंग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष महाराज परसा व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment