गोंदिया,दि.04: सोशल मीडिया वर मुले पळवणारी, चोरी करणारी, किडनी किंवा अवयव काढून घेणारी टोळी फिरत आहे अशा अफवा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या अफवांमुळे अनोळखी व्यक्तींना मारहाण, दुखापत करण्यात येत असल्याचा घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अशा प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले आहे.
जिल्ह्यात मुले पळविल्याची एकही घटना अलिकडच्या काळात कोणत्याही पोलिस ठाण्यात नोंदविलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी व्हाट्सअप, फेसबूक, आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये. अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत तर काही घटनांत मारहाणीने मृत्यू झाले आहेत. त्यातून जमावावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. अशाच अफवेमुळे नुकतेच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात गावकèयांनी केलेल्या बेदम मारहाणीत ५ मजुरांचा मृत्यू झाला आहे . सोशल मीडियावर अफवा व्हायरल करणाèयावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी जनतेला केले आहे. कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर आलेला कोणताही मॅसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये. सोशल मीडियातून आलेल्या मॅसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अफवा पसरविणाèया तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरविण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अफवेला बळी पडून आपल्या हातून गंभीर गुन्हा घडल्यास संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी स्वतःहून कायदा हातात घेऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले आहे.
समाज कंटकावर वचक बसविण्यासाठी गोंदिया जिल्हयातील प्रत्येक पोलिस स्टेशन अंतर्गंत पोलिस पाटलांच्या नियमित बैठका घेतल्या जात आहे. पोलिस पाटलांनी गावातील अनोळखी व्यक्तीची मुशाफिर रजिस्टरमध्ये नोंद घेवून त्याबाबत संबंधित ठाणेदारांना माहिती अवगत करुन दयावी. तसेच पोलिसांनी गावोगावी प्रत्यक्ष जावून ग्राम भेटी सुरु केल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन गोंदिया पोलिस विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment