Tuesday, 6 December 2016

शासकीय इतमामात जयललिता यांच्या पार्थिवाचे दफन

चेन्नई, दि. 6 - अभिनेत्री आणि मुख्यमंत्री या दोन्ही भूमिकेतून तामिळ जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे जयललिता यांना चेन्नईच्या मरिना बीचवर मंगळवारी संध्याकाळी अखेरचा निरोप देण्यात आला. लाखोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात जयललिता यांच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले. 
 हिंदू ब्राम्हण रिवाजानुसार जे जयललिता यांच्या पार्थिवाचे दहन न करता दफन करण्यात आले. जयललितांच्या विश्वासू सहकारी शशिकला यांनी त्यांच्या पार्थिवावर शेवटचे विधी केले. जयललिता यांचे राजकीय मार्गदर्शक आणि माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांच्या स्मारकाशेजारीच जयललिता यांचे पार्थिवाचे दफन करण्यात आले. राजाजी हॉल ते मरिना बीच या अंत्ययात्रेच्या मार्गावर जनसागर लोटला होता. 
रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी एकच गर्दी केली होती. आपल्या लाडक्या अम्मांना अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात होता. या अंत्ययात्रेमध्ये एकप्रकारची शिस्त दिसत होती. काल संध्याकाळी काही माध्यमांनी जयललिता यांच्या निधनाचे  चुकीचे वृत्त दिल्यानंतर अण्णाद्रमुकच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन अपोलो रुग्णालयाबाहेर पोलिस आणि अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचबाची झाली होती. 
 पण आजच्या अंत्ययात्रेमध्ये अशी कुठलीही घटना घडली नाही. फुलांनी सजवलेल्या ट्रकवर जयललिता यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवाशेजारी जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला उपस्थित होत्या. आपल्या लाडक्या नेत्याचे तामिळनाडूच्या जनतेला अंत्यदर्शन घेता यावे, यासाठी राजाजी हॉलमध्ये जयललिता यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. 
 सर्वसामान्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन जयललितांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. जयललिता यांच्या निधनामुळे छत्र हरपल्याने अनेक अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला होता. मागच्या 75 दिवसांपासून रुग्णालयात असलेल्या जयललिता यांचे सोमवारी रात्री 11.30 वाजता निधन झाले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...