पणजी, दि. 6 : व्यापा-यांनी दहा दिवसांत कॅशलॅस व्यवहार सुरू करावेत, असा आदेश देणारे परिपत्रक सरकारच्या वाणिज्य कर खात्याने जारी करून खळबळ उडवून दिली. यामुळे व्यापा-यांमध्ये निर्माण झालेल्या दहशतीची भाजपलाही कल्पना आली. ते परिपत्रक सरकारने मागे घ्यावे, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस दामोदर नाईक व सदानंद शेट तानावडे यांनी मंगळवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
दि. 30 डिसेंबर पर्यंतही गोवा एकदम कॅशलॅस होऊ शकत नाही. गोव्यात पर्यटक येत असतात. वाणिज्य कर खात्याच्या अधिकाऱ्यांनी अतिउत्साह दाखवला व परिपत्रक जारी केले. व्यापारी व छोटे व्यवसायिक घाबरले. आमच्याकडे तक्रारी येत आहेत. सगळे व्यवहार कॅशलॅस व्हायला हवे या पंतप्रधान मोदी यांच्या धोरणाचे आम्ही स्वागत करतो. टप्प्याटप्प्याने कॅशलॅस व्यवहार व्हायला हवेत. एकदम निर्णय लादता येणार नाही. दि. 30 डिसेंबर्पयतही पूर्ण कॅशलॅस होणे शक्य नाही.
व्यापा-यांना वेळ द्यावा लागेल, असे दामू नाईक म्हणाले. वाणिज्य खात्याचे परिपत्रक मागे घेतले जावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली असून त्यांनी योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे, असे नाईक म्हणाले. सगळेच व्यवहार जर कॅशलॅस झाले तर गोवा भाजपचे देखील सगळे व्यवहार कॅशलॅस होतील. आम्ही सध्या देखील रोख रक्कमेच्या रुपात व्यवहार करतच नाही, असे तानावडे यांनी सांगितले. लोकांना पैसे देऊन भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यासाठी गर्दी खेचली जाते हा विरोधकांचा अपप्रचार आहे. विरोधक निराश झालेले आहेत, असे तानावडे म्हणाले.
No comments:
Post a Comment