गडचिरोली, दि.२: दलित, आदिवासी व ओबीसींवर अन्याय करण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून चालत आला असला तरी आता अन्याय करण्याच्या पद्धतीत बदल होत आहेत. अलिकडे उच्चशिक्षण व उच्चपदांसाठीच्या नोकऱ्यांमधील आरक्षण संपुष्टात आणण्याचा घाट घातला जात असून, संपूर्ण राज्यघटनाच बदलण्याचा प्रयत्न होत आहे. जातियवाद्यांचे हे षडयंत्र सर्वांनी संघटितपणे हाणून पाडावे, असे आवाहन राज्य अनुसूचित जाती,जमाती आयोगाचे अध्यक्ष न्या.सी.एल.थूल यांनी आज येथे केले. सम्यक फाउंडेशनच्या वतीने गडचिरोली येथील प्रेस क्लब भवनात आयोजित ‘मागासवर्गीयांच्या समस्या आणि संवैधानिक उपाययोजना’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी नेते मारोतराव कांबळे, रोहिदास राऊत, प्रा.शेषराव येलेकर, भरत येरमे, गौतम मेश्राम, भिमराव पात्रीकर, प्रा.डॉ.दिलिप बारसागडे उपस्थित होते. न्या.थूल पुढे म्हणाले, बाबासाहेबांनी राज्यघटनेत ओबीसी, आदिवासी आणि अनुसूचित जातींसाठी स्वतंत्र कलमा टाकून त्यांच्या उत्थानाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला. त्या तरतुदीनुसारच मागासलेला समाज प्रगती करीत आहेत. परंतु आता शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. बोगस आदिवसीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही सरकार त्याची प्रभावी अंमलबजावणी करीत नसल्याने खऱ्या आदिवासींवर अन्याय होत आहे. त्यामुळे अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आदिवासी, ओबीसी व दलितांनी आपापसातील मतभेद विसरुन लढा देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
या चर्चासत्रात गौतम मेश्राम म्हणाले की, संविधान पोहचविण्याचे काम सरकारकडून पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही. भरत येरमे म्हणाले की, सरकार आदिवासींसाठी कपडे वाटप, वस्तूवाटप यासारख्या योजना राबविते. परंतु त्याद्वारे आदिवासींची प्रगती होणार नाही. बोगस आदिवासींमुळे खऱ्या आदिवासींना लाभापासून वंचित राहावे लागते, असेही ते म्हणाले. प्रा.शेषराव येलेकर म्हणाले की, सर्वप्रथम मनूने आरक्षणाची सुरुवात केली. मनूनेच शिक्षण, व्यवसाय, उद्योगात उच्चवर्णीयांची मक्तेदारी निर्माण केली. परंतु आता मनूचेच समर्थक आरक्षणाला विरोध करीत आहेत. आरक्षण हा अधिकार नाकारलेल्यांना प्रतिनिधीत्व मिळवून देण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे आरक्षणविरोधकांना जाब विचारण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी म्हणाले की, आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी मनुवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे. यावेळी भिमराव पात्रीकर यांनीही आपले विचार मांडले.प्रास्ताविकातून प्रा.दिलिप बारसागडे यांनी चर्चासत्राची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा.राजन बोरकर, तर आभारप्रदर्शन बाळू टेंभूर्णे यांनी केले.
No comments:
Post a Comment