मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांचे विशेष प्रयत्न
गोंदिया (सुरेश भदाडे),दि.०६ – राज्याच्या अंतिम टोकावर वसलेला गोंदिया जिल्हा. मागास, आदिवासी, अतिदुर्गम, नक्षलप्रभावीत अशी सर्वदूर असलेली ओळख. डोंगरदऱ्या आणि जंगलाने व्यापलेला भूभाग तसा नैसर्गिक संसाधनांनी वेढलेला. आदिवासी बहुल या जिल्ह्यात नेहमी साथीच्या रोगांचा थैमान असायचा. पिण्याचे पाणी आणि उघड्यावर होणारी नैसर्गिक विधी त्याला कारणीभूत समजली जायची. परंतु, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि निर्मल ग्राम योजनेच्या माध्यमातून यावर मात करता येते, हे सिद्ध झाले. हाच धागा पकडून शासनाने हागणदारी मुक्त गाव ही योजना राबवायला सुरवात केली. गोंदिया जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे हे झपाटल्यागत जिल्ह्यात हा उपक्रम राबवीत आहेत. त्यांच्या सहकाèयांच्या कष्टाला जिल्ह्यात 'अच्छे दिन' येत असल्याचे दिसून येत आहे.
उघड्यावर होणारी नैसर्गिक विधी आणि अशुद्ध पिण्याचे पाणी हे साथीच्या रोगाचे कारण असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. याशिवाय अशा घाणीमुळे वातावरण सुद्धा दूषित होत असते. या बाबींचे निर्मूलन करण्यासह गावाला सुंदरता आणि समृद्धी आणण्याच्या उद्देशाने राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि निर्मल ग्राम मोहीम राबविण्यात आल्या. या दोन्ही अभियानात गोंदिया जिल्ह्याने आपला डंका पिटल्याचा इतिहास आहे. शासनस्तरावर इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना आणि मनरेगाच्या माध्यमातून गावागावात शौचालये बनविण्याचे धोरण आखले गेले. अनेक ठिकाणी तर श्रमदानातूनसुद्धा कार्य करण्यात आले. पण पुढे चालून या मोहिमेला कोठेतरी खीळ बसल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागातील राजकारण आणि स्वच्छता मोहिमेतील हरवलेले सातत्य यामुळे कमी खर्चात बांधलेल्या शौचालयाची देखभाल झाली नाही. शासकीय योजनांविषयी लाभार्थ्यांना अंधार ठेवून बांधकाम करणारे कंत्राटदार यामुळे शौचालय बांधकामाकडे झालेले दुर्लक्ष, गरजूंची अपूर्ण बांधकामे आदी कारणांनी पुढे उघड्यावर शौच करण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढले. यावर अंकुश लावण्यासाठी शासनाने हागणदारी मुक्त गाव ही मोहीम सुरू केली. पण ती गेल्यावर्षी पर्यंत तरी कागदावरच वाटायची. असे असताना गोंदिया जिल्हा परिषदेचे मुकाअ श्री. ठाकरे यांनी गोंदिया जिल्ह्यात अशा मोहिमांना ग्रामीण भागात मिळणारा प्रतिसाद याचा अभ्यास केला. एवढेच नाही तर ते स्वतः गुडमार्निग पथकात सामील सुद्धा झाले. परिणामी, त्यांच्या या सहभागाने जिल्ह्यातील मोहिमेचा प्रसार-प्रचार झपाट्याने तर झालाच, पण त्यांचे उत्तम परिणाम सुद्धा दिसू लागले. आता पर्यंत मुकाअ व त्यांच्या गुडमार्निग पथकातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि त्यांची चमूने जिल्ह्यातील प्रत्येक गाव पिंजून काढला. पाच-पाच फेऱ्या करून ग्रामस्थांच्या सभा घेऊन मार्गदर्शन केले. तिरोडा, गोरेगाव,आमगाव आणि मोरगाव अर्जूनी तालुक्यात काहींना आर्थिक दंड सुद्धा आकारला गेला. उघड्यावर शौचाला जाणाऱ्या ग्रामस्थांमध्ये जागृती येऊ लागली. गावात दवंडी देऊन जुने शौचालय दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला जात आहे. इंदिरा आवास, रमाई आवास योजना आणि मनरेगाअंतर्गत शौचालय बांधकाम आणि दुरुस्तीच्या कामांनी जिल्ह्यात वेग घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी, आमगाव, सालेकसा, गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, सडक अर्जूनी आणि मोरगाव अर्जूनी या आठही तालुक्यातील प्रशासन श्री रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात हागणदारी मोहीम जोमात राबवीत आहेत.
No comments:
Post a Comment