
ग्रामसेवक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गोंदिया,09- माझे बिल का काढत नाही, असे म्हणत आरोपी असलेल्या एका सरपंचाच्या पतीने ग्रामसेवकास जबर मारहाण केल्याचा प्रकार गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चारगाव येथे घडला. दरम्यान, आचारसंहिता काळात पदाधिकाऱ्याच्या पतीने शासकीय कामात ढवळाढवळ करत एका शासकीय कर्मचाऱ्यास जबर मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणी संदर्भात महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना काल बुधवारी (ता.8) सोपविले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात जिल्हा शाखेचे अध्यक्ष कार्तिक चव्हाण, सचिव प्रदीप ठाकरे, कार्याध्यक्ष कमलेश बिसेन, कोशाध्यक्ष लक्ष्मण ठाकरे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. दरम्या, आरोपी राधेश्याम गेंदलाल पटले (45) राहणार चारगाव विरुद्ध रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, चारगावचे ग्रामसेवक वेदमूर्ती मनराज साकुरे (40) राहणार मरारटोली हे घटनेच्या दिवशी आपल्या दैनंदिन कामानिमित्त ग्रामपंचायत चारगाव येथे गेले होते. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात संघटनेने आरोपी पटले यांच्यावर सदर ग्रामसेवकावर प्राणघातक हल्ला करणे, शासकीय कामात हस्तक्षेप करणे, आचारसंहितेचा उल्लंघन करणे, दमदाटी करणे, शिवीगाळ करणे,धमकी देणे असे गंभीर आरोप केले आहेत. या घटनेने संपूर्ण ग्रामसेवक संवर्ग दहशतीखाली आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. अशा घटना वारंवार होणार नाही, यासाठी ग्रामसेवकांना संरक्षण देण्याची मागणी करीत सदर आरोपीवर कठोर कारवाईची मागणी या निवेदनातून सरकारला केली आहे. कारवाई न केल्यास ग्रामसेवक संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा निवेदनातून सरकारला देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment