रामरहीमच्या वासनेची शिकार ठरलेल्या दोन महिला गेल्या १५ वर्षांपासून न्यायाची प्रतीक्षा करत होत्या. गुरमीतला त्याच्या पापाची शिक्षा देण्यासाठी कायदेशीर लढाई लढत होत्या. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला. न्यायमूर्तींनी रामरहीमला बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवलं होतं. या निकालानंतर, हरियाणातील पंचकुला, सिरसा भागात हिंसाचार उसळला होता. राम रहीमच्या समर्थकांनी ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक केली होती. त्यात ३८ जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झालेत.
या पार्श्वभूमीवर, आज रामरहीमला विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायमूर्ती जगदीप सिंह यांनी शिक्षा सुनावली. भादंवि कलम ३७६, ५११ आणि ५०६ अन्वये त्यांनी बाबाची रवानगी १० वर्षांसाठी तुरुंगात केली. निकालाचं वाचन पूर्ण झाल्यानंतरही, रामरहीम रोहतक तुरुंगातील कोर्टरूममधून बाहेरच यायला तयार नव्हता. तिथेच फरशीवरून तो रडत होता. त्याला पोलिसांनी खेचून बाहेर आणलं आणि वैद्यकीय तपासणीसाठी नेलं. आता त्याला कैद्याचे कपडे दिले जातील आणि त्याला कोठडीत ठेवलं जाईल.
No comments:
Post a Comment