Friday 18 August 2017

हे तर दगाबाजांचे सरकार- नामदेव उसेंडी



देवरी येथे शेतकऱ्यांचा उपविभागीय कार्यालयावर विक्रमी मोर्चा
देवरी,१८ (विशेष प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान पेटवून राज्यात व देशात सत्ता काबीज केली. स्वतःला शेतकऱ्यांचे तारणहार सांगत विधीमंडळासमोर धानाच्या पेंड्या जाळल्या. जनतेने त्यांच्या भाषणांवर विश्वास टाकला आणि त्यांनी दिल्ली व मुंबईची गादी काबीज केली. मात्र, सत्तासुंदरी मिळताच त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. कधी नोटबंदी, तर कधी कॅशलेस अशा वल्गना करीत सामान्य नागरिकांना वेठीस धरले. कालाधन व जनधनच्या नावावर लोकांना लुटले. अत्यंत बिकट परिस्थिती असताना पावसाने सुद्धा दगा दिला. विदर्भ आणि मराठवाड्यात सुक्या दुष्काळाची गडद छाया आहे. शेतकरी कर्जाने पुरता पिचला आहे. अशाही अवस्थेत देशाचे प्रमुख विदेश वाऱ्या करीत आहेत, तर राज्याचे प्रमुख ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याचा ढोल पिटत आहेत. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात त्यांनी दमडी सुद्धा दिली नाही. एकीकडे पीक विमा असो वा कर्जमाफी असो ऑनलाइनच ससेमिरा शेतकèयांच्या पाठीमागे लावला. दुसरीकडे, मात्र इंटरनेटचा सर्वर बंद करून शेतकऱ्यांविरुद्ध कपट कारकारस्थान केले जात नाही. या सरकारला शेतकऱ्यांना काहीही द्यायचे नाही, हे व्यापाऱ्यांचे सरकार आहे. गोड बोलून सत्ता मिळविणारे हे दगाबाजांचे सरकार आहे, असा घणाघाती आरोप गडचिरोलीचे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार नामदेवराव ऊसेंडी यांनी आज शुक्रवारी (ता.१८) देवरी येथे शेतकऱ्यांच्या मोर्च्यात बोलताना केला. दरम्यान, हजारोंच्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांच्या या मोर्च्याने तालुक्यातील मागील सर्व रेकॉर्ड मोडल्याच्या चर्चा होत्या.
देवरी तालुका काँग्रेसच्या वतीने दुष्काळी परिस्थितीला घेऊन राज्यसरकारच्या विरोधात कर्जमाफी व पीकविमा संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावे सरकारला निवेदन देण्यासाठी उपविभागीय कार्यालयावर मोर्च्याचे आयोजन आज करण्यात आले होते. या मोर्च्याची सुरवात जिल्हा परिषद मैदानातून करण्यात आली होती. या मोर्च्याला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या मोर्च्याचे नेतृत्व माजी आमदार रामरतन राऊत यांनी केले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे पुरुषोत्तम कटरे,पंचायत समितीच्या उपसभापती संगीता भेलावे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, उषा शहारे, माधुरी कुंभरे,सुषमा घरतकर, मनेंंद्र ब्राम्हणवाडे, चैनसिंह मडावी,सुरेंद्र बनसोड, रणजित कासम,डॉ. चंद्रभान सोनबोईर,ओमप्रकाश रामटेके आदी पदाधिकारी हजर होते. यावेळी मोर्च्याला मार्गदर्शन करताना माजी आमदार रामरतन राऊत म्हणाले की, कॉंग्रेसच्या काळात केवळ १२ हजार कोटींची कर्जमाफी केल्या गेली होती. त्यावेळी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. त्यावेळी कोणतेही निकष थोपले गेले नव्हते. पण राज्याचे मुख्यमंत्री हे ३८ लाखाची जाहिरात बाजी करून ३६ हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याचे ढोल बदडत आहेत. या कर्जमाफीचे पैसे गेले कोठे, असा प्रश्न उपस्थित करीत शेतकऱ्यांवर निकषांवर निकष लावले जात आहेत. त्याउलट देशाच्या जनतेचा पैसा लटून परदेशात पलायन करणाऱ्यांना हे सरकार संरक्षण पुरवीत आहे. नोटबंदी व जनधनच्या नावावर या सरकारने आधीही लोकांना रांगेत उभे केले. कर्जमाफीसाठी व पिकविम्यासाठी ऑनलाइनची अट घातली. १०० किलोमीटर अंतरावरून तालुक्यास्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वर डाऊन असल्यामुळे आल्या पावली परत जावे लागते. पुन्हा पुन्हा येण्यासाठी या शेतकऱ्यांना परत सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. पिकविम्याचेही तेच हाल आहेत. सरकारकडे सर्व कर्जांची आकडेवारी असताना ही नाटके कशासाठी, हे आता जनतेने समजून घेतले पाहिजे. हे सर्वसामान्यांचे सरकार नाही, तर लबाडांचे सरकार असल्याचे ही श्री. राऊत म्हणाले. दरम्यान, मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना देण्याचे हे सरकार नाकारत असल्याचेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...