Tuesday 15 August 2017

अखेर सापडला मानव व वानरांचा पूर्वज!


 केनिया,15(वृत्तसंस्था)-आज हयात असलेल्या सर्व मानवांचा आणि वानरांचा समान पूर्वज कसा दिसत होता याचा उलगडा केनिया देशात उत्खनन करणाऱ्या मानववंशशास्त्रज्ञांना सापडलेल्या एक कोटी तीस लाख वर्षांपूर्वीच्या लहान वानरांच्या कवटीद्वारे झाला आहे.
लिंबासारख्या आकाराच्या या कवटीचा शोध २०१४ साली उत्तर केनियातील तुर्काना तलावाजवळ लागला होता, असे नेचर या वैज्ञानिक नियतकालिकात आज प्रकाशित झालेल्या वृत्तांतात म्हटले आहे. ही आतापर्यंत सापडलेल्या कवटीत सर्वाधिक पूर्ण आकारात असून ती प्रागैतिहासातील मध्यनव अथवा मिओसिन कालखंडातील आहे. संशोधकांनी या कवटीचा समावेश वानरांच्या नव्या प्रारंभिक जीवजातीच्या गटात केला. या जीवजातीचे नाव न्यान्झापिथेकस अलेसी असे ठेवले. तुर्काना भाषेत अलेसी याचा अर्थ पूर्वज असा होतो.

त्याच्या चेहऱ्यात आज आढळणाऱ्या गिबन जातीच्या वानराच्या पिल्लाशी जुळणारे आहे. मात्र त्याच्या कानाची अंतर्गत रचना चिंपांझी आणि मानवाशी अधिक जुळणारी आहे. अलेसीचा मेंदूही तत्कालीन माकडांच्या तुलनेत दुप्पट आकाराचा असून तो सुमारे सात चमच्याच्या ऐवजाएवढा होता. त्याचे दात विकसित झालेले पण अद्याप बाहेर न आलेल्या अवस्थेत होते. सर्व माणसे आणि वानर हे एका पूर्वजापासून उत्क्रांत झाली असे मानले जाते. आजपासून सुमारे साठ ते सत्तर लाख वर्षांपूर्वी चिंपांझी आणि माणूस यांच्यातील दुवा असलेला हा पूर्वज आफ्रिकेत राहात होता, असे मानले जाते. तथापि, एक कोटी वर्षांपूर्वीचे जीवाष्म पुरावे सापडणे कठीण असल्याने माणूस आणि वानरातील दुवा सिद्ध करण्यात वैज्ञानिकांना अडचणी येत होत्या.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...