Thursday 17 August 2017

चिनी वस्तूंचा बहिस्कार फक्त सेल्फी पुरताच...?

नागपूर,17 : भाजप केंद्रात, राज्यात आणि नागपूर महानगरपालिकेत सत्तेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेल्या चिनी वस्तूंच्या विरोधातील आंदोलनात कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात सहभागी होणे अपेक्षित आहे. गेल्या बुधवारी पक्ष कार्यालयासमोर महिला कार्यकर्त्या आल्या, अगोदर ‘सेल्फी’ काढल्या; नंतर बोटावर मोजण्याइतपत चिनी वस्तू दोन बादल्यांमध्ये बुडविल्या, परत ‘फोटोसेशन’ केले अन् ‘चायनीज मोबाईल’वर ‘से नो टू चायना’ असे लिहित ‘फोटो’ शेअर केले. अशारीतीने ‘सेल्फीमय’ आंदोलनाचे सोपस्कार पार पाडले. प्रसिद्धीच्या नादात बुधवारी महिला कार्यकर्त्यांच्या आंदोलनातील पार हवाच निघून गेली.
बुधवारी भाजपा महिला मोर्चातर्फे गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयासमोर चिनी वस्तूंच्या विरोधात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून ही माहिती पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. प्रत्यक्षात आंदोलनस्थळी ५० हून अधिक महिलादेखील जमल्या नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे आंदोलनस्थळी नियोजनाची तर बोंबच होती. अवघ्या चार ते पाच चिनी वस्तू होत्या. ‘चिनी वस्तू बुडवा’ असे आंदोलन होते. मात्र अतिउत्साहात कार्यकर्त्यांनी पायदळी वस्तू तुडविल्या. मग नेमके आंदोलन काय, याची आठवण आली.
ऐनवेळी जवळील दुकानांमधून दोन बादल्या आणल्या गेल्या आणि अगोदरच तोडलेल्या ‘चिनी’ वस्तूंना १ फूट पाण्यात जलसमाधी देण्यात आली. या आंदोलनाला पाहून शहर भाजपाच्या काही पदाधिकाºयांनी तर कपाळावरच हात मारून घेतला. शहराच्या महापौर डॉ. नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत हे नियोजनशून्य आंदोलन झाले. या ‘सो कॉल्ड’ आंदोलनाला काही आजी-माजी नगरसेविकादेखील उपस्थित होत्या. कार्यकर्त्यांची ‘सेल्फीगिरी’ पाहून एका माजी महिला महापौरांनी संतापदेखील व्यक्त केला व कार्यकर्त्यांना फटकारले. मात्र त्यांच्या हाती सत्तेची चावी नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचे बोलणे गंभीरतेने घेतलेच नाही.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...