करंजी
येथे आरोग्य उपक्रेंद्राचे लोकार्पण
|

15 ऑगस्ट रोजी आमगाव तालुक्यातील करंजी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानातून बांधण्यात
आलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री बडोले यांनी केले,
यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे
होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, पं.स.सभापती हेमलता डोये,
जि.प.सदस्य सुरेश हर्षे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, तहसिलदार साहेबराव राठोड, पं.स.सदस्य यशवंत
बावनकर, सरपंच पंचफुला बागडे, उपसरपंच चंद्रसेन शेंडे, तालुका आरोग्य अधिकारी
डॉ.चंदू वंजारी, उपअभियंता सुनील तरोणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रीराम शेंडे, सेवा
सहकारी संस्थेचे अध्यक्ष चेतराम हुकरे, श्रीमती जांभूळकर यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बोलताना पुढे म्हणाले, ग्रामीण भागात रस्त्यांची चांगली सुविधा
उपलब्ध करुन देण्यासोबतच विविध घटकातील लाभार्थ्यांना घरकूल, गॅस कनेक्शन वाटप अशा
वैयक्तीक योजनांचा सुध्दा लाभ देण्यात येत आहे. ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे
यासाठी गावे स्वच्छ व सुंदर झाली पाहिजे. गावाच्या विकासासाठी आपण सर्वोतोपरी मदत
करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शाळेतील मुलांना शिक्षकांनी, पालकांनी मोठे स्वप्न
दाखविले पाहिजे. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले पाहिजे, त्यामुळे ते जबाबदार
नागरिक होवून पुढे येतील. करंजीची शाळा सौर ऊर्जेवर डिजीटल केल्याबद्दल शाळेच्या
मुख्याध्यापक व शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.
श्रीमती मेंढे म्हणाल्या, हे आरोग्य उपकेंद्र लोकांच्या आरोग्य सेवेत
इमारतीच्या लोकार्पणामुळे रुजू झाले आहे. त्यामुळे ही इमारत रुग्ण व बाळंतपणासाठी उपयुक्त
ठरणार आहे. ग्रामपंचायतींना देण्यात आलेला 14 व्या वित्त आयोगाचा निधी विकास
कामासाठी खर्च करुन विकास कामाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली
पाहिजे. गावातील प्रत्येक घरी शौचालय असले पाहिजे व त्याचा प्रत्येकाने नियमीत
उपयोग केला पाहिजे. विकास कामात लोकांचा सहभाग महत्वाचा आहे असे त्या म्हणाल्या.
आमदार पुराम म्हणाले, कोणताही व्यक्ती हा मुलभूत गरजांपासून वंचित राहू
नये. आरोग्याची सुविधा असणे ही अत्यंत महत्वाची गरज आहे. स्वातंत्र्याच्या 70
वर्षानंतर उपकेंद्राचे उदघाटन होत आहे ही भूषणावह बाब नाही. जिल्ह्यात पाऊस
नसल्यामुळे शेतीची स्थिती भिषण आहे. शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी
दयावे असे सांगून ते म्हणाले, ज्या विभागात रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांची
भरती करण्याचे अधिकार शासनाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस
अधीक्षकांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्रीमती डोये व श्री.हर्षे
यांचीही भाषणे झाली.
पालकमंत्र्यांनी यावेळी जि.प.शाळेच्या सौर ऊर्जेवर आधारित असलेल्या डिजीटल
क्लासरुमचे उदघाटन केले. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ.श्याम निमगडे यांनी केले. उपस्थितांचे आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंदू
वंजारी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment