Wednesday 16 August 2017

आरक्षण हा घटनेने दिलेला अधिकार

नागपूर,16-देशातील मागासवर्गीयांना भारतीय घटनेने दिलेल्या आरक्षणाच्या घटनात्मक तरतुदींना न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून छेद देण्याचे प्रयत्न अलीकडे मोठया प्रमाणात सुरू आहेत. बढतीतील आरक्षण नाकारण्याचा निर्णय, मेडिकल व इंजिनीअरींग मधील आरक्षित घटकातील वैधतापत्र नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे व इतरही याप्रकारचे निर्णय देशातील समस्त आरक्षणवादी घटकांसाठी धोक्याची घटना आहे. आरक्षण हा घटनादत्त अधिकार असून याबद्दल जनतेला सावधानतेचा इशारा देण्यासाठी तसेच राज्यातील घटनात्म्क आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष उभारण्याची घोषणा आदिवासी संघर्ष परिषदेत करण्यात आली.
सीताबर्डीतील हॉटेल हरदेवसमोरील बचत भवन येथे रविवारी ही परिषद पार पडली. अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. दरशथ भांडे होते. परिषदेचे उद्घाटन पशुसंवर्धन व मत्स्य विभाग मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाले. येत्या २० ऑगस्टला चंद्रपूर येथे रक्त स्वाक्षरी आंदोलनाने सुरुवात होणार आहे. मोर्चे, धरणे, निदर्शने, सांकेतिक व साखळी उपोषणे, आमदारांच्या घरापुढे निदर्शने, नागपूर, अमरावती व गडचिरोली येथील आदिवासी विकास विभागाच्या जात तपासणी कार्यालयावर हल्लाबोल, गावपातळीवर, तालुका पातळीवर व जिल्हापातळीवर संघटन बांधणी, मोर्चांचे आयोजन व नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा असे या उलगुनाचे टप्पे आहे. दुसऱ्या सत्रात दिल्ली येथील जंतरमंतरवर मोर्चा काढणे व धरणे तसेच त्यानंतर अन्यायग्रस्त आदिवासींच्या मतशक्तीचे प्रबोधन व जागरण आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत संघटित मतशक्तीचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने अन्यायग्रस्त आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचे वचन दिले होते. त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्नशीर असून, परिषद हा त्याचाच एक भाग असल्याचे परिषदेचे निमंत्रक व भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी व्यक्त केले. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आदिवासींना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली. परिषदेचे अध्यक्ष डॉ. दशरथ भांडे यांनी युती व पूर्वीचे काँग्रेस आघाडी सरकार हे आंधळया बहिऱ्याचे सरकार असून, झोपेंचे सोंग घेत असल्याचा आरोप केला. खुर्ची हलविल्याशिवाय या सरकारची झोप उघडणार नाही याकडे लक्ष वेधत मतशक्ती संघटित करून सार्वत्रिक निवडणुकीत शक्तिप्रदर्शन करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी काही ठरावही पारित करण्यात आले. परिषदेत विश्वनाथ आसई, दे.बा. नांदकर, धनंजय धार्मिक, प्रकाश निमजे, धनंजय धापोडकर, अॅड. नंदा पराते, चंद्रभान पराते यांच्यासह विविध जमातीच्या प्रतिनिधींनी विचार मांडले. संचालन ओमप्रकाश पाठराबे यांनी केले. आभार मनोहर पोराडकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...