Tuesday 15 August 2017

'त्या' खासगी क्षणांसाठी पोलिसांनी घेतले १ लाख

मुंबई,15- गँगस्टर फरार प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीतून पोलिसांचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. या प्रकरणी १० पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी गँगस्टरला पत्नीसोबत हॉटेलमध्ये 'ते' खासगी क्षण घालवण्यासाठी वेळ दिला होता. यासाठी गँगस्टरच्या पत्नीने पोलिसांकडे मागणी केली होती. याकरिता पोलिसांनी १ लाख रुपये मोबदला घेतला होता.
३० वर्षाचा आरोपी हनुमान पाटील हॉटेलमधील रुमच्या खिडकीतून फरार झाला. यावेळी रुमच्या दाराबाहेर पोलिसांचा पहारा होता. जेजे मार्ग पोलिसांनी तळोजा तुरुंगातून हनुमान पाटील याला सोमवारी ताब्यात घेतले. पाटील त्या दिवशी हॉटेलमधून पळाला कसा? याची चौकशी आता पोलीस करत आहेत.
मालमत्तेवरील वादात सिडकोच्या एका कर्मचाऱ्याचं अपहरण करून खून केल्या प्रकरणी २०१३ मध्ये आरोपी हनुमान पाटील याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर १९९९ च्या मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फरार झाल्यानंतर गेल्या महिन्यात पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली. यानंतर त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलंय.
वैद्यकीय चाचणीसाठी पाटीलला ११ फेब्रुवारीला जेजे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. दुपारी दीड वाजता त्याला जेजे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. तिथे त्याची पत्नी मोनाली त्याला भेटली. यानंतर औषधांकरिता मेडिकल दुकानावर जाण्यासाठी त्याने पोलिसांची परवानगी मागितली. यावेळी दोन पोलीस कॉन्स्टेबल त्याच्यासोबत पाठवण्यात आले आणि इथेच सगळ्या प्रकरणाला कलाटणी मिळाली.
दोन्ही कॉन्स्टेबल आरोपी पाटील आणि त्याच्या पत्नीला हॉटेल ब्राइटवेमध्ये घेऊन गेले. आरोपी पाटील करता त्यांनी तीन तासांसाठी हॉटेलची रुम बुक केली. पाटीलची पत्नी मोनालीने यासाठी पैसे दिले. साधारण ३ वाजता पाटील पत्नी मोनालीसोबत हॉटेलच्या रुममध्ये गेला. दोन तासानंतर कॉन्स्टेबलने दरवाजा वाजवल्यानंतर मोनालीने दरवाजा उघडला. यावेळी पाटील खिडकीतून फरार झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर दोन्ही कॉन्स्टेबल जेजे हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी पूर्ण घटना वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितली.
पतीसोबत 'ते' खासगी क्षण घालवण्यासाठी गँगस्टरची पत्नी मोनालीने पोलिसांना १ लाख रुपये दिले होते, हे तपासातून समोर आलं आहे. 'हा गंभीर गुन्हा आहे. यामुळे संबंधित पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल. तसंच पोलीस विभागांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल', अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...