Friday 18 August 2017

खासदार नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा : डाॅ. अजयराव तुमसरे

तब्बल सव्वा तीन वर्षांनी शेतकरी प्रेम ऊतु आलं 
  गोंदिया,18- राज्य शासनाची छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना फसवी असल्याचे लक्षात येताच फडनवीस सरकार शेतक-याप्रती असंवेदनशिल असल्याचे मत खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जर सरकार शेतकऱ्याप्रती असंवेदनशील असेल व अशा सरकार मध्ये राहून प्रश्न सुटत नसतील, तर नानाभाऊंनी खासदारकीचा राजीनामाच द्यावा, अशी मागणी डॉ. अजयराव तुमसरे यांनी केली आहे.
 खासदार पटोले यांनी लोकसभेत स्वामिनाथन आयोग लागू करण्याचा प्रश्न कधीही लावून धरला नाही. धानाच्या आधारभूत किंमती विषयी ते संसदेत बोलले नाही. मात्र, तब्बल तीन वर्षांनी खासदारांचे शेतकरी प्रेम ऊतू आलेलं आहे. सत्तेत नसताना नाना पटोले यांनी शेतक-यांचे प्रश्न उचलत सरकारची अनेकदा कोंडी केली. आता तर तेच सत्तेत आहेत. एवढेच नाही तर नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात धानाची पेंढी जाळत विरोध दर्शवला होता. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धानाला साडेतीन हजार रूपये भाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय येथील कृषी पंपाना 24 तास विज मिळणार नाही, महागाई नियंत्रणात नाही, अशी भूमिका घेत निदर्शने करून जनतेचा विश्वास संपादन केला. शेतकरी आणि जनतेनेही नाना पटोले यांना खासदार बनवून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदेत पाठविले. परंतू जनतेची दिशाभूल करून तब्बल सव्वा तीन वर्षांनी खासदार साहेबांना जाग आली. पुढच्या लोकसभेला 21 महिने बाकी असताना आता आपल्याच सरकारवर ताशेरे ओढणे सुरू केले. जर सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील आहे आणि अशा सरकार मध्ये राहून प्रश्न सुटत नसतील तर खासदारकिचा राजीनामा देऊन कोणत्याही राजकीय पार्टीत प्रवेश न घेता शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करीत शेतक-यांसोबत असल्याचे दाखवून द्यावे. उगीच जनतेला संभ्रमात ठेवू नये, असे आवाहन  अखील भारतीय शेतकरी संकटमोचन समितीचे प्रवक्ता डाॅ. अजयराव तुमसरे यांनी केलेले आहे.
   त्याचप्रमाणे या आधीही नाना पटोले यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाती करीता राखीव होताच शेतकऱ्यांचे  कैवारी आपणच असल्याचे भासवून आमदारकीचा राजीनामा दिला होता. राज्य सरकार छत्रपतींच्या नावाचा वापर करून शेतकऱ्यांना भावनिक करत कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरून कमीत कमी शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी देता येईल, हेच धोरण आखले असल्याचा आरोपही डाॅ. तुमसरे यांनी केलेला आहे. 
   दोन दिवसापूर्वीच भंडारा जिल्ह्यातील एका आमदाराने पत्रकार परिषदेत सांगितले की 10 हजार रूपयाचे तातडीचे कर्ज जिल्ह्यात 131 शेतकऱ्यांना दिलेला आहे. जिल्ह्यात सव्वा दोन लाख शेतकरी असताना फक्त 131 शेतकऱ्यांना 10 हजार रूपयाचे कर्ज देऊन बाकीच्या शेतकऱ्यांची टिंगल सरकार करीत आहे काय? असा संतप्त सवालही डाॅ. अजय तुमसरे यांनी केलेला आहे. 
   राज्यात 2014-15 या आर्थिक वर्षात काही जिल्हे दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणून घोषीत केलेले होते. परंतु, भंडारा जिल्ह्याला यामधून वगळण्यात आलेला होता. स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध पाहून भंडारा जिल्ह्याचाही दुष्काळग्रस्त म्हणून समाविष्ट करण्यात आलेला होता. परंतु, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आलेला नाही. या वर्षी तर जिल्हा भयानक सुक्या दुष्काळाच्या सावटाखाली असताना दुष्काळ निवारण संदर्भात एकही मागणी लावून धरण्यात आलेली नसल्याची खंतही डाॅ. तुमसरे यांनी व्यक्त केली. 
  त्याचप्रमाणे उन्हाळी धानपिकाला आतापर्यंत बोनसही देण्यात आलेला नसल्यामुळे मागील तीन महिन्यात सर्वात जास्त आत्महत्या जिल्ह्यात झालेल्या आहेत. त्यामुळे खासदार नाना पटोले यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि कोणत्याही राजकीय पक्षात न जाता शेतकऱ्यांसोबत असल्याचे दाखवावे, असे आवाहन अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन संघटनेचे प्रवक्ता डाॅ. अजयराव तुमसरे यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...