Saturday, 12 August 2017

नवीन अंशदायी पेंशन - हेच मोठे टेंशन!


भारत देश आज प्रगतिपथावर आहे. अनेक योजना सरकार लोकांच्या कल्याणासाठी व विकासासाठी राबवीत असते. त्याचे श्रेय घेणे कोणतेही सरकार सोडत नाही. पण आज जो वर्ग समाज घडवितो, समाजाला दिशा देतो व देश घडविण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलतो, तो शिक्षक आज अडचणीत आहे. सन २००५ नंतर जे कर्मचारी सरकारची नोकरी करतात ते आज भविष्याप्रती चिंताग्रस्त आहेत. सरकारने २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी अंशदायी पेंशन योजना सुरू केली व नवीन तारुण्यात असलेल्या कर्मचाऱ्यांना अंधारात ढकलून दिले.
आज प्रत्येक दिवस हा कर्मचारी आपल्या कुटुंबाच्या भविष्याबाबत चिंतेत आहे. आज जर मी मरण पावलो तर माझे कुटुंब वाऱ्यावर येईल, त्याला आधार कोण देईल? हा प्रश्न नेहमी भेडसावत असतो. 'समान काम,  वेतन' हे वाक्य ऐकायला चांगले वाटते. पण प्रत्यक्षात उलट स्थिती आहे. आज सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा खूप आहेत. पण त्यांचे भविष्य अंधारात टाकून सरकार मिळवणार काय?
आज अनेक कर्मचारी अपघातात किंवा आकस्मिक मृत्यू पावतात. हे ऐकले तरी पायाखालची जमीन घसरून जात आहे, हे समजत नाही. अंग थंडगार पडत आहे. उद्या माझ्यासोबत काही घडले तर माझ्या कुटुंबाचे काय? असा प्रश्न त्याला नेहमी उदासीनतेच्या गर्तेत लोटत आहे.
अनेक कर्मचारी हे गरिबीतून आणि कष्टाने सरकारी नोकरी मिळवितात. सुखाच्या अपेक्षेने मोठ्या आनंदात नोकरी करतात. शासनाशी प्रामाणिक राहून सर्व कामे करतात. पण आजचा कर्मचारी प्रत्येक क्षण हा मानसिकदृष्ट्या  कमकुवत बनला, तर देश कसा समृद्ध होईल? अनेक कर्मचारी मरण पावले. त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. सुखात घातलेले दिवस दुःखाच्या दरीत निमूटपणे पडून आहेत. परिस्थिती खूप बिकट आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या बायका नवऱ्याच्या जिवावर थाटामाटात जीवन जगत होत्या, त्यांच्या मरणानंतर कुणाच्या तरी घरी  भांडे घासणे, धुणे फूल विकणे शेण फेकणे अशी कामे करताना दिसत आहेत. हे पाहून साहजिकच डोळ्यात पाणी येते. पण त्याचे गांभीर्य सरकारला नाही. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. येथे सगळ्यांना न्याय मिळतो, अशी मोठ्याने भाषणे ठोकणाऱ्या  लोकप्रतिनिधींना समजेल काय?
साहेब तुम्ही पाच वर्षे राहता. तरी तुम्हाला पेंशन आहे. पूर्ण आयुष्यभर नोकरी करणाऱ्याला काय मिळायला पाहिजे साहेब? तुम्ही म्हणाल तसे करू, जसे राबा म्हणाल तसे राबू. पण आमचे कुटुंब उघड्यावर येण्यापासून वाचवा हो साहेब. माझा शिक्षकवर्ग बुद्धिजीवी, विचारवंत आणि दिशादर्शक आहे. आपले लहानबंधू इतक्या गंभीर विषयासाठी झटत आहेत. आपण इतके वर्ष शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावता तर मग लहान भावंडांचे काय? इतक्या संघटना, इतके नेते, सभासद. काहीतरी करा हो.
                                                हाक मारतो सगळ्यांना, 
                                                असे उघड्यावर पडू देऊ नका।  
                                                उद्या आम्ही काय आदर्श घेणार,
                                               लढणार की निव्वळ आराम करणार।।  
                                       शासन दरबारी एकच मागणी, जुनी पेंशन- भयमुक्त जीवन।
राष्ट्र घडविताना आमचे भविष्य ही घडू द्या. नवीन अंशदायी पेंशन योजनेत शासन कर्मचाऱ्यांचे १० टक्के पगार कपात करते व तितकाच वाटा शासन जमा करते. निवृत्तीच्या वेळेस ६० टक्के निधी परत व ४० टक्के निधी कुठेतरी गुंतविणार व त्यापासून मिळणारा लाभांश ही तुमची पेंशन काय? पण जर कर्मचारी मरण पावला तर त्याचे काय? जमा झालेला पैसा कुठे आहे, हे अजून प्रशासनालाच माहीत नाही. शासनाचा वाटा कधी मिळणार हे  शासनालाही माहीत नाही. प्रत्येक कर्मचारी कार्यालयाला भेट देतो. हिशेबाचा पत्ता नाही. हा पैसा जातो तरी कुठे?, हेही समजत नाही.
सन २००५ नंतर लागलेला कर्मचारी हा संकटात आहे. कोणीतरी त्यांचे दुःख समजून घ्याल का? डॉ. बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली. माझ्या देशातील प्रत्येक व्यक्ती ही आनंदात जगली पाहिजे. तिला तिचा हक्क मिळाला पाहिजे. न्याय मिळविण्यासाठी संघर्ष हा करावाच लागणार. कारण मूल रडल्याशिवाय आई सुद्धा मुलाला दूध पाजत नाही. तसं काहीतरी आवाज उठविल्याशिवाय शासन तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाही. लोकशाहीचे रक्षक आपली सोय बरोबर करून घेतात. पण तिचे पालन करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर वेगळा न्याय का? जे गेले त्यांना काही भेटले नाही. पण त्यांच्या उघड्यावर पडलेल्या कुटुंबासाठी आपण जिवंत राहून काही तरी करू या. असे केल्याने त्यांच्या आत्म्याला किमान शांती तरी मिळेल.

-   श्री. सदाशिव पाटील
जि.प.शाळा येळमागोंदी
९४०५१२७६७६

1 comment:

  1. जुनी पेन्शन ही मिशन बाकी काहीच नाही

    ReplyDelete

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...