Monday 14 August 2017

मुलाच्या प्रेमात आंधळा झालो होतो: सिंघानिया

 मुंबई,14-'मुलाच्या प्रेमात मी आंधळा झालो होतो. त्या आंधळेपणातूच एका बेसावध क्षणी माझ्या नावावरचे सगळे शेअर मी त्याच्या नावावर करून बसलो आणि माझ्यावर बेघर होण्याची वेळ आली,' अशी खंत व्यक्त करतानाच, 'जिवंत असेपर्यंत सर्व संपत्ती मुलांच्या नावे करू नका,' असा सल्ला रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांनी दिला आहे.
उद्योगपती विजयपत सिंघानिया यांचा सध्या त्यांच्या मुलाशी म्हणजेच, गौतम सिंघानिया यांच्याशी संपत्तीवरून वाद सुरू आहे. हा वाद सामोपचारानं मिटावा, असंही त्यांचं म्हणणं आहे. मात्र, मुलाबद्दलच्या मतांवर ते आजही ठाम आहेत. 'मी खोटा असेन तर गौतमनं तिरुपती बालाजीची शपथ घेऊन तसं सांगावं. तसं झालं तर मी त्याच्याविरुद्धचा खटला मागे घ्यायला तयार आहे. पण गौतम असं करणार नाही,' असंही ते हतबलतेनं म्हणाले.
'सगळं काही मुलाच्या नावावर करून मी घोडचूक केली. माझ्या या चुकीमुळं त्याचं खरं रूप समोर आलं. अनेकदा लोक स्वत:चा खरा चेहरा लपवत असतात. पण त्यांच्याकडं ताकद आली की ते बिघडतात. मी काहीही खरेदी करू शकतो, हा अभिमान त्यांच्यात येतो,' असं सांगून सिंघानिया पुढं म्हणाले, 'जिवंत असेपर्यंत आपली सर्व संपत्ती कधीही मुलांच्या नावावर करू नका. भविष्याचं काही सांगता येत नाही. कदाचित तुमचा मुलगा घराण्याच्या नावाला बट्टाही लावू शकतो. वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय हे विसरून तो आपले रंग दाखवू शकतो.'

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...