पालकमंत्री व खासदाराची मध्यस्थीची चर्चा
गोंदिया,05- गोंदिया येथील कुवर तिलकसिंह रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका डॉक्टरला भाजपच्या एका माजी अध्यक्षाने आमाणुष मारहाण केल्याची चर्चा शहरात आहे. दरम्यान, त्या दोषी नेत्याला वाचविण्यासाठी पालकमंत्री आणि एका खासदाराने दबाव टाकून प्रकरण दडपल्याचे सुद्धा बोलले जात आहे. यामुळे रुग्णालय प्रशासन कमालीचे दहशतीत आले आहे. उल्लेखनीय म्हणजे याच भाजप नेत्याने बाजारसमितीच्या एका पदाधिकाऱ्यास धमकावल्याचे सांगण्यात येते.
सविस्तर असे की, गोंदियाच्या केटीएस रुग्णालयात दोन दिवसापूर्वी डुकराने जखमी केलेल्या रुग्णाने उपचार घेऊन त्याच दिवशी सुटी घेतली. आज दोनच्या सुमारास तोच इसम पुन्हा उपचाराच्या नावाखाली परत रुग्णालयात आला. त्यावेळी कर्तव्यावर असलेले डॉ. महम्मद जुबेर इक्बाल हे दुसऱ्या रुग्णांची तपासणी करीत होते. यावर त्या रुग्णाने माझ्यावर आत्ता उपचार करा, असा आग्रह धरला. यावर त्या डॉक्टरांनी फक्त दोन मिनिटे थांबायला सांगून उरलेल्या रुग्णांची तपासणी करून उपचार करतो, असे त्या रुग्णाला सांगितले. यावर त्या रुग्णाने त्या दबंग भाजप नेत्याला बोलावण्याची धमकी दिली. त्यावर डॉक्टरांनी थोडावेळ थांबण्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित रुग्णाने त्या भाजप नेत्याला बोलावून घेतले. तो भाजपचा नेता आपल्या कार्यकर्त्यांसह थेट रुग्णालयात पोचून तु मुझे पहचानता नही क्या, असे म्हणून त्या डॉक्टरांच्या कानशिलात लगावली. तो भाजपचा नेता एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या डॉक्टरला अश्लिल शिवीगाळ करून जबर मारहाण केल्याची माहीती आहे. या घटनेने घाबरलेले डॉक्टर पोलिस तक्रार करायला निघाल्यामुळे पाचावर धारण बसलेल्या त्या दबंग नेत्यांनी आपल्या नेत्यांचा आसरा घेतला. चक्क पालकमंत्री व एका खासदाराने त्या डॉक्टरला फोन करून तक्रार न करण्याचा सल्ला दिल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपच्या नावावर ही दादागिरी कोणत्या थराला जाणार,असा प्रश्न गोंदियाकरांना पडला आहे.
No comments:
Post a Comment